वडाळा महादेव या निसर्गरम्य, शांत स्थळी प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींचा आश्रम वसला आहे. अतिप्राचीन महादेवाचे हेमाडपंथी देवस्थान असलेले हे वडाळा गाव. जिल्हा अहमदनगर, तालुका श्रीरामपूर पासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. आश्रमातील वातावरण प्रसन्न आहे. आश्रमातून स्वर्गीय, दिव्या महानियत, परंपवित्रता प्रगटते. चित्त-शक्तीचा विलास इथेच आढळतो. जो माणसात क्रांती करतो दिव्यता बहाल करतो, परामतृप्तीचा, परमसमाधानाचा गंध देतो.
आश्रमात पाऊल ठेवताच अद्वैताच्या मंदिरी पाऊल ठेवल्याची अनुभूति येते. परमशांती , परमानंदाची लहर स्पर्शते. इथे अशी परामशुद्धता आहे, जी सर्वत्र वाहणारी अति तरल, परमसुक्ष्म आणि विलक्षण संकल्पसिद्धी संपन्न कि ज्याच्या स्पर्शाने साधनेत, ध्यानात विलक्षण प्रगती होईलच. शिवाय ध्यान तुमच्यात मुरेल, नसानसातून वाहील व सहज होईल आणि समाधानाची चवही चाखायला मिळेल.
आश्रमात नित्यनैमित्तिक सण-उत्सव साजरे केले जातात. सकाळी व संद्याकाळी नित्य उपासना व प्रार्थना, रुद्रस्वाहाकार, चण्डियाग, सप्तशती पाठ, गुरुचरित्रादी पारायणे केली जातात. भजने-किर्तने, प्रवचने होतात. अश्वत्थ, औदुंबर, अवली अशा पवित्र वृक्षांचे पूजन होते. तुलसी पूजन आवर्जून केले जाते. गाईची नित्य सेवा व पूजा-अर्चा केली जाते.